मुंबई : जेष्ठ उद्योगपती रतन टाटा अनंतात विलीन झाले आहेत. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी टाटा कुटुंबियांसह उद्योग, राजकारण यांसह विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्व वरळी स्मशानभूमी येथे उपस्थित होते. रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. रतन टाटा यांच्या अंत्यविधीवेळी वरळी स्मशानभूमीबाहेर सर्वामान्य नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
रतन टाटा यांचे काल रात्री(बुधवार) ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86 व्य वर्षी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनमुळे देशाच्या उद्योग क्षेत्रासह समाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. रतन टाटा यांचे पार्थिव आज सकाळी 10 वाजता मुंबईतील एनसीपीए येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह बॉलिवूड, उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी अत्यंदर्शन घेतलं होतं. सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचे पार्थिव एनसीपीए येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्वसामान्यांनी गर्दी केली होती.
दुपारी 4 वाजेनंतर रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळी स्मशानभूमीच्या दिशेला नेण्यात आले. रतन टाटा यांचे पार्थिव वरळी स्मशानभूमीत आणणल्यानंतर पारसी रितीरिवाजाने अंत्यविधी करण्यात आले. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरळी स्मशानभूमीत विविध क्षेत्रातील दिग्गजांची गर्दी होती. तर स्मशानभूमीबाहेर सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होती. यावेळी वरळी स्मशानभूमी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.