मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस असून, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे तीव्र आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे यांनी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

मराठा समाजाने घरात बसून न राहता आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. ज्या आंदोलकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत, तसेच नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा नागरिकांनी अंतरवाली सराटी येथे यावे, असे त्यांनी सांगितले. समाजातील उदासीनता आणि मरगळ झटकून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बाहेर पडण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी म्हटले.

विखे पाटील यांच्या भूमिकेवर टीका करताना जरांगे यांनी अधिकाऱ्यांच्या पातळीवर काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. कलेक्टरऐवजी तहसीलदार, एसडीएम आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारने काही निर्णय घेतले असले तरी त्याचवेळी समाजाचे नुकसानही होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. गेल्या काही काळात आपण फडणवीस आणि शिंदे यांच्यावर थेट टीका केली नाही, मात्र आता सरकारकडून होत असलेल्या कारवाईबाबत समाजाला जागरूक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरही जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ५८ लाख नोंदी शोधण्यात आल्या असून, या नोंदींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि इतर मंत्र्यांनी सावध भूमिका घ्यावी आणि मराठा समाजाला अपेक्षित निर्णय द्यावा, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, २९ ऑगस्टचे आंदोलन अंतरवाली सराटी येथेच होणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पुढील टप्प्यात मुंबईकडे मोर्चा वळवला जाईल, असा दावा त्यांनी केला. पाच टप्प्यांत मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल, असेही जरांगे यांनी सांगितले.







