मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या त्यांच्या जागी आता वरिष्ठ आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली मुंबई महापालिकेत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मेट्रो वुमन म्हणून ओळख असलेल्या आश्विनी भिडे यांची बदली मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. आश्विनी भिडे या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या जागी आता अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे आयुक्त अभिजित बांगर यांची मुंबईत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ राव हे आता ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून कारभार पाहणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महानगरपालिकांमधील आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार या वरील बदल्या करण्यात आल्या आहेत.