मुंबई: सरकारने ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६ लाख २५ हजार १३९ अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबईत ६३ हजार ९०, नाशिकमधून १ लाख १२ हजार ७६१, पुणे ९१ हजार ६२५, अमरावती १ लाख ३२ हजार ७५८, नागपूरमधून १ लाख १० हजार ४५५, छत्रपती संभाजीनगर विभागातून ४२ हजार ९७६ आणि लातूर विभागातून ७१ हजार ४७४ अर्ज पात्र झाल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना राबवण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच त्यांचे मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून ३ हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यंभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सव्र्वाइकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र/प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शासनाने केले आहे.