मुंबई: मुंबईतील घाटकोपर परिसरात 12 वर्षीय विद्यार्थ्याच्या मानेत नशेचे इंजेक्शन टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बर्वेनगर परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक 3 मध्ये शिकणाऱ्या यश चौरसिया या विद्यार्थ्यासोबत ही घटना घडली. शाळेसमोरील मैदानात मित्रांसोबत खेळत असताना काही जणांनी त्याला मागून येत मानेत इंजेक्शन टोचल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश शाळेसमोरील मैदानात मित्रांसोबत खेळत होता. याच मैदानात सहा ते सात जण नशा करण्यासाठी बसत असल्याचे सांगण्यात येत आहे. यश खेळत असताना याच गटातील काही जणांनी त्याच्याजवळ येत मागून त्याच्या मानेत इंजेक्शन टोचले. या प्रकारानंतर काही वेळातच यशला चक्कर येऊ लागली. त्याला तापही आला आणि तो मैदानातच खाली बसला.

यशची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी यशला जवळील महापालिकेच्या मुक्ताबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून यशचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
शाळेच्या परिसरातच एका अल्पवयीन विद्यार्थ्याला अशा प्रकारे नशेचे इंजेक्शन टोचण्यात आल्याने पालकांमध्येही चिंता वाढली आहे. शाळा आणि मैदानांच्या आसपास नशेखोरांचा वावर रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.







