पुणे: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवाशांसाठी वाहतूक व्यवस्था अधिक सोपी करण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यासाठी बस, ॲप-आधारित टॅक्सी, रिक्षा, कार रेंटल आणि मोफत शटल बस अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल ४,६८९ वाहनांचा ताफा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज केला जात आहे.

पुणेकरांसाठी विशेष ई-शिवाई बससेवा सुरू करण्यात येणार असून, पुणे ते नवी मुंबई विमानतळ या प्रवासासाठी ४५० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळ पुणे, दादर आणि बोरिवलीशी थेट जोडले जाणार आहे. दादर ते विमानतळासाठी १७० रुपये, तर बोरिवली ते विमानतळासाठी २१० रुपये तिकीट दर असणार आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ठाणे आणि नाशिकसाठीही बससेवा सुरू करण्याची योजना आहे.

राज्य परिवहन महामंडळातर्फे ७ ऑक्टोबरपासून दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान वातानुकूलित ई-शिवाई बस नियमित धावणार आहे. ही बस अटल सेतूमार्गे धावेल. दादर, भायखळा, सीएसएमटी, अटल सेतू, गव्हाण फाटा आणि नवी मुंबई विमानतळ असा तिचा मार्ग असेल. दादरहून पहिली बस सकाळी ५.३० वाजता, तर शेवटची बस रात्री ९.३० वाजता सुटेल. विमानतळावरून पहिली बस सकाळी ७ वाजता आणि शेवटची रात्री ११.३० वाजता सुटणार आहे. १२ वर्षांखालील मुलांना तसेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत मिळणार आहे.

याशिवाय मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान दर तासाला मोफत शटल बससेवा उपलब्ध होणार आहे. सिटीफ्लो, आर्या आणि चलो यांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाईल. चलो बसच्या माध्यमातून अंधेरी पूर्व, वांद्रे, दादर आणि कुलाबा येथून दररोज २१ फेऱ्या जोडल्या जातील. बेलापूर, नेरूळ, पनवेल आणि खारकोपरसाठी दर १५ ते २० मिनिटांनी बस उपलब्ध असतील.
टॅक्सी आणि इतर पर्यायही वाढवण्यात येत आहेत. उबर गो, उबर प्रीमियर, उबर ऑटो आणि कार रेंटलसह १० ऑक्टोबरपासून ‘भारत टॅक्सी’ची सेवाही ४० वाहनांसह सुरू होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.






