नवी मुंबई : खूप भाषा शिका. परंतु जेथे राहता, तेथील मातृभाषा शिका आणि बोला. असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील भाषांसंदर्भात महत्वाचा सल्ला दिला. त्याचच एक उदाहरण देताना त्यांनी आंध्रप्रदेश, तामिळनाडू किंवा बंगालमध्ये गेल्यावर ती लोक हिंदी बोलतात का? असा प्रश्न केला. मग महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी का बोलता? माझा हिंदीला विरोध नाही. परंतु महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी कानावर आल्यावर त्रास होतो,असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.
हिंदी ही उत्तम भाषा आहे. परंतु हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही. ज्या पद्धतीने मराठी, तेलगू, कन्नड भाषा आहेत, तशीच हिंदी आहे. मी यापूर्वी असे बोलल्यावर माझ्यावर अनेक जणांनी टीका केली. त्यानंतर मी गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय दाखवला. तेव्हा ते शांत बसले. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रात पहिली ते दहावी सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
पंतप्रधान मोदींवर टीका अन् स्पष्टीकरण
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा टीका केली. पंतप्रधानांना त्यांची भाषा आणि राज्यांबद्दल प्रेम आहे. त्यांना स्वत:च्या राज्याचे प्रेम लपवता येत नाही. यामुळे जगातील सर्वोच्च पुतळा गुजरातमध्ये झाला. हिऱ्यांचा व्यापार गुजरातमध्ये गेला. गिफ्ट सिटी गुजरातमध्ये होत आहे. जर पंतप्रधानांना त्यांच्या राज्यासंदर्भात प्रेम असेल तर आपल्याला का नाही? असे राज ठाकरे यांनी म्हटले.