मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली. याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी करताना मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, गरज वाटल्यास सदावर्तेंना पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा देण्यात आली आहे.
सदावर्ते काय म्हणाले?
मनोज जरांगे आणि त्यांचा समर्थकांना मुंबईत आंदोलनाची परवानगी न देण्याची मागणी सदावर्ते यांनी आपल्या याचिकेतून केली आहे. ज्या मार्गानं ते मुंबईकडे निघालेत ती शहरं त्यावेळी बंद करावी लागली. आज पुण्यात शाळा, कॉलेजं, दुकानं बंद करावी लागली. काही तासांत जरांगे आपल्या ताफ्यासह ठाण्यात पोहचतील. हजारो बैलगाड्या, ट्रैक्टर शहरात आली तर ट्राफिकची काय अवस्था होईल? असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात युक्तिवाद करताना केला.
कायदा आणि सुव्यस्थेची जबाबदारी
सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी त्यांची भूमीका काही मुद्द्यांतून मांडली आहे. आमच्याकडे अद्याप मनोज जरांगे किंवा त्यांच्याकुणाकडूनही आंदोलनाची परवानगी मागणारे पत्र आले नसल्याचे महाधिवक्ता यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याची परवानगी आहे, पण त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. कायदा आणि सुव्यस्था राखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही योग्य तो सारी पावलं उचलू, पण त्याचे विपरीत परिणाम झाले? तर जबाबदारी कुणाची? हा देखील प्रश्न असल्याची भूमिका त्यांनी मांडली.