मुंबई : सुदृढ आणि निरोगी असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी प्रयत्नही केले जातात. पण काही समस्या या उद्भवत असतातच. त्यापैकी एक म्हणजे कान दुखणे. तुमचाही सतत कान दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. जर कानात खाज येत असेल तर घरातील कोरफडीचे रोप फायद्याचे ठरू शकते.
कान दुखत असल्यास आपलं डोकं एका बाजूला झुकवून एलोवेरा जेलचे तीन ते चार थेंब कानात टाकू शकता. ते बाहेर काढण्यापूर्वी काही सेकंद ते थेंब कानातच राहू द्या. कोरफड कानाच्या आतील भागातील पीएच लेव्हल सुधारते. त्याचे अँटीइन्फ्लमेट्री गुणधर्म कोरडे, खाज येणाऱ्या, जळजळणाऱ्या कानांना शांत करतात. तेल हे देखील फायद्याचे मानले जाते. अनेक एसेंशियल ऑईल्स आहेत ज्याचा वापर कानांतील खाज दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो.
आले देखील कानदुखीवर गुणकारी मानले जाते. आल्यामध्ये नैसर्गिक अँटीइन्फ्लमेट्री गुणधर्म असतात जे कानदुखीपासून मुक्त होण्यास फायदेशीर ठरू शकतात आणि कानाला खाज सुटण्यापासून देखील आराम देऊ शकतात. आल्याचा रस कानाच्या सभोवतीने लावा किंवा आल्याचा रस गरम करून गाळून तेलात मिक्स करा. हे मिश्रण किंवा तेल कानाच्या बाहेरून मागच्या व सभोवतीच्या सर्व भागावर लावा. त्याने फायदा होऊ शकतो. मात्र, हे करत असताना आल्याचा रस थेट कानात जाणार नाही याची काळजी नक्की घ्या.