मुंबई : मुंबईमध्ये एका विकृताने 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठ्वल्या असल्याचं समोर आलं आहे. विकृताला अटक करण्यात आली आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्यात ही कारवाई झाली असून आयटी ॲक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (36) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो वांद्रे येथील बेहरापाडा परिसरात पराठ्याचे दुकान चालवतो. आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नेमका प्रकार काय..?
वांद्रे पूर्व येथील 30 वर्षीय गृहिणीला 14 जूनला अनोळखी क्रमांकावरून मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणारा व्यक्ती अश्लील संभाषण करायला लागला. तेव्हा महिला दूरध्वनीवर त्याला ओरडली असता आरोपीने तिला अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवण्यास सुरूवात केली. त्यामुळे सदर महिला घाबरली. सुरूवातीला तिने दुर्लक्ष केले. परंतु आरोपी वारंवार त्रास देत असल्यामुळे तिने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर निर्मल नगर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) रौफ शेख यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले आहे.
मोबाईलमधील तंत्रज्ञानाची अधिक माहिती..
हा विकृत आरोपी विवाहीत असून त्याला दोन मुले आहेत. मुंबईतील बेहरामपाडा परिसरात आरोपी भाडेतत्त्वाच्या घरात इतर मित्रासोबत राहतो. आरोपीने गुन्ह्यांसाठी आठ विविध मोबाईलचा वापर केल्याचे तपासत समोर आले आहे. आरोपी कमी शिकलेला असून तरी त्याला मोबाईलमधील तंत्रज्ञानाबाबत बरीच माहिती असल्याने त्याला पकडणे अवघड झाले होते.
एकूण 25 महिलांना त्रास..
तंत्रज्ञानाची मदत घेऊन आरोपी खानला शुक्रवारी सापळा रचून बेहरामपाडा परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यावेळी आरोपीकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपीच्या मोबाईलच्या तपासणीत तो मुंबईतील 25 महिलांना अशा प्रकारे त्रास देत असल्याचे उघड झाले आहे. या महिलांना आता पोलीस संपर्क साधून आरोपीविरोधात तक्रार करण्याचे सांगण्यात आले आहे.