ठाणे: ठाण्यातील एका नामांकित खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या ४० वर्षीय अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून तब्बल १ कोटी ३९ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील ३५ वर्षीय महिला आणि तिच्या एका साथीदाराविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जून २०२३ मध्ये संबंधित अधिकारी कामानिमित्त मुंबईतील एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांची एका महिलेशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवरून नियमित संवाद सुरू झाला. महिलेने अधिकाऱ्याशी भावनिक जवळीक निर्माण करत विश्वास संपादन केला. पुढे चांगले आयुष्य जगण्याचे आश्वासन देत तिने आर्थिक मदतीची मागणी करण्यास सुरुवात केली.

या काळात दोघे काही ठिकाणी फिरण्यासाठीही गेले. त्यावेळी अधिकाऱ्याचे काही खासगी फोटो काढण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या फोटोचा गैरफायदा घेत महिलेने विविध कारणे सांगून अधिकाऱ्याकडून वारंवार पैशांची मागणी केली. परदेशातील काही सहलींचा खर्चही त्यांच्याकडून करून घेतल्याचा आरोप आहे. तसेच महिलेच्या बँक खात्यात सुमारे २४ लाख रुपये वळते करण्यात आले. अशा विविध व्यवहारांतून एकूण १ कोटी ३९ लाख ८१ हजार रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, पैशांची मागणी वाढत गेल्यानंतर अधिकाऱ्याने पुढे पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधित महिलेने आणि तिच्या साथीदाराने त्यांना कथितरित्या ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. खासगी फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची तसेच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे तर, महिलेच्या साथीदाराने अधिकाऱ्याच्या पत्नी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर अधिकाऱ्याने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी महिला आणि तिच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून, आर्थिक व्यवहार, खासगी फोटो आणि धमक्यांबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.






