मुंबई : मुंबईतील एका गृहनिर्माण सोसायटीच्या मीटिंगमध्ये झालेल्या किरकोळ वादात सोसायटीच्या अध्यक्षाने सदस्याचा दाताने अंगठा तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई उपनगरातील दहिसर परिसरातील पश्चिम म्हात्रेवाडीत आज रविवारी (दि. ०४) ही घटना घडली. सोसायटीच्यावतीने सदस्यांसाठी आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या बैठकीत सदस्य आणि अध्यक्षात किरकोळ वाद झाला, त्याचे पडसाद चक्क हाणामारीत झाले. या हाणामारीत अध्यक्षाने सदस्याचा अंगठाच कापला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील दहिसर पश्चिमेकडील म्हात्रे वाडी परिसरात अमरनाथ अपार्टमेंट आहे. या अपोर्टमेंटमध्ये आज (दि. ४) सकाळी सोसायटी अध्यक्षांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अध्यक्षांसह अनेक सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी सोयायटी सदस्य आदित्य देसाई यांचा सोसायटी अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यासोबत किरकोळ वाद झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला कि, अध्यक्ष नित्यानंद परिहार यांनी चक्क दाताने सदस्य असलेल्या आदित्य यांचा अंगठाच तोडल्याचा आरोप आदित्य यांनी केला आहे. या घटनेनं सोसायटीत मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास एमएचबी पोलिस करत आहेत.
दरम्यान, आदित्य देसाई यांनी याबाबत प्रतिक्रया दिली आहे. ते म्हणाले, आज ११ वाजता दहिसर पश्चिमेकडील म्हात्रे वाडी या ठिकाणी असलेल्या अमरनाथ अपार्टमेंटमध्ये सोसायटीची मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये सोसायटीच्या काही विषयांवर चर्चा होणार होती. यावेळी मी तिथे गेलो आणि सोसायटीच्या अध्यक्षांना पत्रक दिलं. त्यावेळी ते मला उलटसुलट बोलायला लागले.
त्यानंतर मग मी पण त्यांना सुनावलं. यानंतर त्यांनी मला धक्का दिला आणि खाली पाडून माझ्या अंगावर बसले. माझा चष्मा फोडला. मी त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर माझा अंगठा त्याच्या तोंडात गेला आणि त्याने चावल्याने अंगठ्याचे दोन तुकडे झाले. मला खूप वेदना होत आहेत, असे सोसायटीचे सदस्य आदित्य देसाई म्हणाले.