मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी करण्यात आली. मात्र, माजी मंत्री छगन भुजबळ यांचा या बॅनरवर फोटो लावण्यात आला नाही. त्याचवेळी छगन भुजबळांचे कट्टर विरोधक असलेले सुहास कांदेंना मात्र बॅनरवर स्थान देण्यात आलं. त्यावर छगन भुजबळ
यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जरी त्यांच्या बॅनरवर माझा फोटो लावला नाही, तरी लाखो गरिबांच्या हृदयात आपला फोटो असणं ही बाब माझ्यासाठी पुरेशी आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. प्रकाश शेंडगे आणि इतर ओबीसी नेत्यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मला मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचं मत ओबीसी नेत्यांचं झालं आहे. ओबीसी समाजातील विविध नेत्यांनी भेट आपली भेट घेतली आणि त्यांनी आपल्यासोबत असल्याचं सांगितलं. तुम्ही बाहेर असल्याने आम्ही त्रस्त असल्याचंही ते म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, मी लोकसभेची तयारी केली होती. पण त्यावेळी मला थांबवण्यात आलं.
त्यानंतर राज्यसभेच्या दोन जागांवर संधी होती. मात्र त्यावेळीही मला तुमची राज्यात गरज आहे असं सांगत थांबवण्यात आलं. मग आता गरज संपली का? मंत्रिमंडळात तरुणांना संधी देण्यासाठी आपल्याला थांबवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. पण तरुणपणाचे वय काय आहे? तरुणांना संधी द्या पण काही जागा सिनिअर लोकांसाठी ठेवायला हव्यात ना. आधीच सांगायचं ना विधानसभेला उभे राहू नका म्हणून, असं छगन भुजबळ म्हणाले.