मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत, नाराज नेते आपलं नशीब आजमावू बघण्यासाठी इतर राजकीय पक्षांचा विचार करताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला होता. त्यानंतर अनके आमदार अस्वस्थ असल्याचं म्हटलं बोललं जात आहे. अशातच आता भाजपाचे बडे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील अस्वस्थ असल्याची चर्चा होऊ लागली आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबात एक सूचक विधान सुद्धा या चर्चेला बळ पुरवत आहे.
हर्षवर्धन पाटील अस्वस्थ, लवकरच मोठा निर्णय घेणार?
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते सद्या शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक सूचक विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांचं सूचक विधान कोणतं?
‘हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते आहेत. ते लवकरच योग्य निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा राज्याच्या हिताचा असेल’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सुळे यांच्या या सूचक विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आला आहे.
इंदापुरातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक..
हर्षवर्धन पाटील हे भाजपाच्या तिकिटावर इंदापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं बोललं जात आहे. परंतु, ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला जागा, असे सूत्र महायुतीने ठरवल्याचे म्हटले जात आहे. सध्या हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात आहे. या जागेवर मंत्री दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाच मिळणार याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. जर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला तर तो भाजपासाठी मोठा धक्का असणार आहे.