मुंबई : नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली असून त्यामध्ये महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडल्याचे दिसून आले. आता लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील पक्षांनी विधानसभा निवडणुकीकडे आपलं लक्ष केंद्रीत केले आहे. बड्या-बड्या नेत्याविरोधात कोणता उमेदवार उतरवायचा याबाबत खलबतं केली जात आहे. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुतीने जय्यत तयारी सुरु केल्याचे चित्र आहे. याच दिशेने पावलं टाकताना आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुतीकडून वरळी विधानसभेतील उमेदवार निश्चित झाला आहे. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या समोर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचे आव्हान असणार आहे. त्यासंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
आदित्य ठाकरे विरोधात संदीप देशपांडे
लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसून येत आहे. महायुतीकडून पराभवाचे आत्मचिंतन केलं जात असताना, दुसरीकडे विधानसभेची रणनीतीही तयार केली जात आहे. लोकसभेनंतर आता राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुका खुणावत आहेत. महायुतीमधील राज ठाकरे यांचा मनसे पक्ष विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मनसेचे संदीप देशपांडे आव्हान देणार आहे. राज ठाकरे यांच्याकडून संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा लढवण्यासाठी सहमती मिळाला आहे.
बॅनरद्वारे शक्ती प्रदर्शन
मनसे नेते संदीप देशपांडे यांना ग्रीन सिग्नल मिळताच त्यांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मनसेकडून वरळी विधानसभेत जागोजागी बॅनर लावून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी मनसे निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वीच तयारीला लागली आहे. लोकसभेत एकत्र असलेली महायुती विधानसभेत एकत्र असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.