मुंबई : शाळेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पान टपऱ्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने त्याबाबतची कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, आता शाळेच्या आवारात असणाऱ्या पानटपऱ्यांबाबतही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, आता अन्न व औषध प्रशासनाला कामाचे टारगेट दिले आहे. ज्यात राज्यात पनीर, तेल, औषधांमध्ये सुरु असलेल्या गैरकारभारावर कारवाई सुरू करण्यात येत आहे. त्यातच आता राज्यातील पानटपऱ्यांवरही कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे शाळेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पानटपऱ्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असेही मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
“१४ विभागाने एकत्र येऊन राज्यात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एन्टीबॉयोटीकमध्ये बनावट औषधे बनवल्याचे समोर आले आहे, यावरही कारवाई केली आहे. आम्ही एक बील पास केलं आहे ते राष्ट्रपतींकडे सहीसाठी गेलं आहे, तो कायदा झाला तर आपण आरोपींवर मोठी कारवाई करु शकतो, तसेच आता इथून पुढे ही कारवाई सुरू राहणार आहे. राज्यात गुटखा बंदी पूर्णपणे करायची आहे. यासाठी मी काम करत आहे, असंही मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
गेल्या काही दिवसापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाने गोंदियामध्ये मोठी कारवाई केली होती. बंदी असताना अवैधरीत्या दुकानात साठवून ठेवलेला १३६.७०२ किलो सुगंधित तंबाखूचा साठा अन्न व औषध प्रशासनाने धाड घालून जप्त केला. देवरी येथील दुर्गा चौक बाजार लाइनमधील विशाल किराणा दुकान येथे ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या तंबाखू साठ्याची किंमत एक लाख २७ हजार ६७५ रुपये आहे, तर भिवंडी शहरातून गुटख्याचा साठा जप्त केला होता. भिवंडीत गुटखा विक्री करणाऱ्या सुमारे ३० हून अधिक किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी चालकां विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता.