मुंबई : वरळीतील स्पामध्ये हत्या झालेल्या गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या हत्येचं कारण अखेर समोर आलं आहे. खंडणीच्या त्रासाला कंटाळून दोन स्पा मालकांकडून सहा लाखांची सुपारी देऊन गुरुसिद्धप्पा वाघमारे याची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आली आहे. मात्र, या हत्या प्रकरणात एक मोठा क्लू पोलिसांना सापडला आहे.
हत्या झालेल्या गुरू वाघमारेच्या दोन्ही मांड्यावर तब्बल 22 नाव गोंदवली आहेत. माझ्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील असं म्हणून चक्क ही नावे गोंदवली आहेत. पोलिसांकडून या लोकांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दर महिन्याला द्याव्या लागणाऱ्या खंडणीला वैतागून गुरुच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान, गुरुसिद्धप्पाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेकडून तीन आरोपी, तर वरळी पोलिसांकडून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
गुरू वाघमारे हा स्पा मालकांना खंडणीसाठी दर महिन्याला त्रास देत होता. गुरूकडून अनेक स्पा मालकांना ब्लॅकमेल केल्याच्या तसेच त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. ज्या स्पामध्ये हत्या करण्यात आली, त्या स्पाच्या मालकाकडून वाघमारे आठ ते दहा वर्षापासून खंडणी घेत होता. या खंडणीला वैतागून हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झाली आहे.
दोन्ही मांड्यावर गोंदवली 22 नावे
गुरुसिद्धप्पा वाघमारे यांनी चक्क आपल्या शत्रूंची नावे आपल्या दोन्ही मांड्यावर गोंदवली होती. माझ्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील असंही त्याने लिहिले होते. त्यामध्ये हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीचही नाव आहे. माझ्या दुश्मनांची नावे डायरीत नोंद आहेत. चौकशी करून कारवाई करावी असंही गुरूने आपल्या मांडीवर गोंदवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या 22 नावांमध्ये स्वतःच्याच कुटुंबातील दोन सदस्यांची नाव असल्याची माहिती समोर आली आहे.