मुंबई: वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात शड्डू ठोकला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती स्वत: सदावर्ते यांनी दिली आहे. याशिवाय महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत 89248 मतं मिळवत ठाकरेंनी मोठा विजय प्राप्त केला होता. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे हे मंत्री देखील झाले होते. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. तर महायुतीकडून वकील गुणरत्न सदावर्ते हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.