ठाणे : मिरा भाईंदर पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक मंगळवारी कारवाईसाठी उत्तनमधील धावगी परिसरात गेले असता गर्दुल्ले, नशेबाजांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एका महिला पोलिसाला लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याने महिला पोलीस गंभीर जखमी झाली आहे. भाईंदर पश्चिमेच्या धावगी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता एकलदेवी असे या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी अब्बास अली मिर्झा (वय 38) आणि अंकुर भारती (वय 28) आणि राजू गौतम (वय 19) या तीन हल्लेखोर आरोपींना अटक केली आहे.
मिरा-भाईंदर आणि वसई विरार अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अमली पदार्थाचे सेवन व विक्री करणाऱ्यांची धरपकड करून कारवाई करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,अमली पदार्थ विरोधी पाच जणांचे मंगळवारी पथक रात्री नऊच्या सुमारास उत्तम परिसरातील धावगी डोंगर येथे कारवाईसाठी गेले होते. यावेळी 15 ते 20 जणांनी पोलिसांची वाद घालून थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस पथकाला आपला जीव वाचवत माघारी फिरावे लागले. यावेळी या जमावाने महिला पोलीस हवालदार लता एकलदेवी यांना बांबूने बेदम मारहाण केली. यामध्ये हल्ल्यात लता एकलदेवी या गंभीर जखमी झाल्या आहेत.