मुंबई : लोकसभा निवणुकीसाठी सर्वच पक्षांची कंबर कसली असून लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रबळ उमेदवार शोधण्याच्या तयारीत आहेत. तसेच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष देखील प्रबळ उमेदवार शोधत आहे. या लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदा यांचं नाव चर्चेत आहे. या उमेदवारीसाठी अभिनेता गोविंदा लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या रेसमध्ये अभिनेता गोविंदा आहुजा याचं नाव सध्या चर्चेत आहे. लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी या अनुशंगानं अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
गोविंदानं 2004 मध्ये भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा फडकावला
गोविंदानं याआधी 2004 मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपचा बालेकिल्ला असणारा राम नाईक यांच्या मतदार संघात गोविंदानं काँग्रेसचा झेंडा फडकावला होता. अभिनेता म्हणून गोविंदा प्रसिद्ध आहे. तसेच राजकिय डावपेच याचीही जाण असल्याने अमोल किर्तीकर यांच्या विरोधात गोविंदा चेहरा चालू शकतो? ठाकरेंकडून रिंगणात उतरलेला उमेदवार आणि विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांचे पुत्र अमोल किर्तीकरांना गोविंदा शह देणार का? या सर्व अनुशंगानं चाचपणीही शिंदे गटाकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.