मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस तैनात असणार आहे. त्यानुसार शुक्रवारपासून जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने मनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आता जरांगे यांच्या सुरक्षेसाठी 24 तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, यापूर्वीच सकल मराठा समाजाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज शुक्रवारपासून दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत.