मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या ऑफिसवरून घरी जात असतना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
पंढरीशेठ फडके हे मुळचे पनवेलचे आहेत. फडके हे बैलगाडा शर्यत शौकिन म्हणून ओळखले जातात. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण ठरलेलेच होते. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. १९८६ सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली.
बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैलगाडा शर्यतीमध्ये गाडीच्या टपावरती नाच करण्यासाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’मालक म्हणून पंढरीशेठ यांची राज्यभर ओळख होती. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.