मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर आता केंद्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येताना दिसत आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून रविवारी 9 जूनला संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत शपथविधी होणार आहे. आता मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणकोणणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली आहे. एनडीएतील घटकपक्षांच्या 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असं सूत्र ठरल्याचे समजते.
त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळण्याचे संकेत आहेत. दरम्यान शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे यांचा समावेश करावा अशी मागणी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती केली असून, आता या तरण्या खासदाराला मंत्रिपद द्यावं ही विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. काल शिवसेनेच्या सर्व खासदारांची दिल्लीमध्ये बैठक झाली.
शिवसेनेच्या विजयी खासदारांमध्ये बुलढाण्याचे प्रतापराव जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, हातकणंगलेचे धैर्यशील माने, छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे, मुंबई उत्तर पश्चिमचे रविंद्र वायकर असे सर्व वरिष्ठ नेते आहेत. लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागांवर विजय मिळाला आहे.
शिवसेनेचे खासदार
- कल्याण लोकसभा – श्रीकांत शिंदे
- ठाणे लोकसभा – नरेश म्हस्के
- मुंबई उत्तर पश्चिम – रवींद्र वायकर
- हातकणंगले – धैर्यशील माने
- छत्रपती संभाजीनगर – संदीपान भुमरे
- बुलढाणा लोकसभा – प्रतापराव जाधव
- मावळ लोकसभा – श्रीरंग बारणे
देशपातळीवरील समीकरणं
- एनडीए आघाडी- 293
- इंडिया आघाडी- 232
- इतर-17