खोपोली : संसार थाटण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीने आपल्या होणाऱ्या जीवनसाथीसाठी काहीही करण्यास तयार असल्याचे सांगत गळफास घेतल्याची घटना खोपोली परिसरात घडली. विशेष म्हणजे, चेंटिंग करताना झालेल्या संभाषणातून ही आत्महत्या घडली आहे. मोबाईल चटिंगच्या दुष्परिणामातून एका युवतीचा हकनाक बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
खोपोली भानवाज येथील सफीज शेख यांची १९ वर्षीय मुलगी यास्मिनचा विवाह हैदराबादेतील सलीम नावाच्या तरुणाशी निश्चित झाला होता. काही महिन्यांनी दोघांना संसार थाटून देण्याचे स्वप्न दोन्हीकडील कुटुंबे पाहत होती. या दोघांचे दररोज मोबाईलवरून चॅटिंग सुरू होते. शनिवारी पहाटे ३ वाजेपर्यंत मोबाईल शुटिंग सुरू असताना दोघांनी परस्परांसाठी जीव देऊ शकतो, असे सांगितले.
सलीम याने त्याच्या घरी फॅनला ओढणी बांधून गळफासही घेऊ शकतो, असे दृश्य तिला दाखविण्यासाठी तिच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल सुरू ठेवला. त्यावर मीही गळफास घेऊ शकते, असे सांगून यास्मिनने घरातील पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला. मात्र, यात ती स्वतःचा जीव गमावून बसली. सकाळी ती जागी झाली नाही म्हणून घरातील व्यक्ती तिला उठवायला गेल्या असता हा खळबळजनक प्रकार समोर आला.
दरम्यान, यास्मिनच्या मोबाईलवरील चॅटिंगमधून या घटनेवर प्रकाश पडला. खोपोली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे.