मुंबई : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात रोज नव-नवीन माहिती समोर येत आहे. मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी बंदूक कशी कशी चालावयची, याबाबत यूट्युबवरुन प्रशिक्षण घेतल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे. याबाबत यूट्युबवर सर्च केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्यामुळे यूट्युबवरील व्हिडीओ पाहून मॉरिस नोरोन्हा यानं गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुरु आहे.
दरम्यान, मॉरिस नोरोन्हा यानं साडी वाटपाच्या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर यांना बोलावून घेतलं होतं. त्यानंतर फेबसबुक लाईव्ह सुरू असतांनाच घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. हत्येनंतर स्वत:वरही त्यानं गोळी झाडून आत्महत्या केली. यासाठी मॉरिस नोरोन्हा यानं बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याच्या बंदुकीचा वापर केला होता. पोलिसांनी अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
डिसेंबरमध्येच रचला हत्येचा कट
अमरेंद्र मिश्राच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, मिश्राला कामाची गरज होती. दोन महिन्यापूर्वी मॉरिस नोरोन्हा यांनी त्यांना कामाची ऑफर दिली. मात्र, कामावर ठेवण्यापूर्वी शस्त्र ऑफिसमध्ये ठेवून जाण्याची अट घातली होती. त्यानुसार, डिसेंबर २०२३ मध्ये ते मॉरिस नोरोन्हा यांच्या कार्यालयात रुजू झाले. त्यांना दर महिना ४० हजारांचा पगार दिला जात होता. यावरुन मॉरिस नोरोन्हा यानं डिसेंबरमध्येच अभिषेक घोसाळकर याच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलं आहे.