नालासोपारा : मुंबईच्या वसईमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वसई पश्चिमेकडील माणिकपूर येथील एका इमारतीच्या बंद घरात तीन जणांचे मृतदेह आढळले आहेत. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. गॅसगळती झाल्यामुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, माणिकपूरच्या नौपाडा येथे आशासदन इमारतीत रविवारी दुपारी एका घरातून गॅसचा वास येऊ लागला. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माती दिली. माणिकपूर पोलिसांनी घराचे दरवाजे तोडून उघडला असता आतमध्ये तिघांचे मृतदेह आढळून आला. यापैकी हॉलमध्ये दोन मृतदेह, तर एक मृतदेह स्वयंपाकघरात आढळला. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून मोहम्मद आझम असे त्याचे नाव आहे. घरातील गॅसगळतीमुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा अंदाज माणिकपूर पोलिसांनी वर्तवला आहे.
माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी म्हणाले, आम्ही घराचा पंचनामा केला आहे. प्रथमदर्शनी कुठलीही गोष्ट संशयास्पद वाटत नाही. गॅस सुरू असल्याचे दिसून आले आहे. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. गॅस सुरू राहिला असावा आणि त्यामुळेच तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, मृतांच्या कुटुंबीयांना संपर्क करण्यात आला असून, हे सर्व उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. मे महिन्यात ते या इमारतीत भाड्याने राहण्यास आले होते. असं चौधरी यांनी सांगितले.