garlic price : मुंबई : जेवणात अन्नामध्ये कांदा आणि लसूण या दोन्बी गोष्टी खूप महत्त्वाच्या आसतात. कांदा किंवा लसूण खाद्यपदार्थात नसले तर जेवणाला चव लागत नाही हे वास्तव आहे. प्रत्येक घराघरात, हॉटेलमध्ये कांदा आणि लसूण बघायला मिळेल. त्यामुळे कांदा आणि लसूण नेहमीच डिमांडवर असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर वाढले होते. ते ओसरले. पण लसूणाबाबत आलेल्या एका बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कांद्याने आतापर्यंत सर्वसामान्यांना रडवलं होतं. त्यानंतर आता लसूण देखील रुसून बसला आहे. बाजारात आता लसणाचे भावदेखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक, महिला वर्ग नाराजी व्यक्त करण्याची दाट शक्यता आहे.
लसणाचे दर का वाढले?
प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडल्याने पिकांच्या खराब उत्पादनामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यपासून 200 ते 250 रुपये किलो असलेला लसूण आता 350 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दादर बाजारपेठेत लसणाचे दर वाढल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. अनेक हॉटेल आणि घरांमध्ये लसणाची चटणी आणि लसणाचे पदार्थ मेनूमधून काढून टाकण्यात येत आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन पीक बाजारात येण्यास वेळ लागेल आणि तोपर्यंत भाव चढेच राहण्याची शक्यता आहे.
प्रतिकिलो 400 ते 410 रुपये
लसणाची आवक घटल्याने भावात वाढ झाल्याचं बोललं जात आहे. सहा महिन्यांपासून बाजारात लसणाची आवक कमी आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने, लसणाच्या भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. चांगल्या दर्जाचा लसूण 350 रुपये किलोपर्यंत गेला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाचा भाव प्रतिकिलो 400 ते 410 रुपये आहे. गेल्या महिन्यात लसणाचा दर किलोमागे 120 ते 140 रुपये इतका होता. पण आता हाच दर 400 रुपयांवर पोहोचला आहे.