मुंबई : गेल्या काही दिवसांपासून फोडणीतून गायब झालेल्या लसणाने पुन्हा स्वयंपाक घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुन्हा लसणाच्या तडक्याचा खमंग स्वाद आणि सुगंध पुन्हा परतला आहे. पंधरा दिवसांपूर्वी एक किलो लसणाचे दर ४०० रुपयांपर्यंत होते. नवीन लसणाची आवक सुरू झाल्यानंतर दरात घसरण झाली आहे. पूर्वी ३६० रुपये प्रतीकिलो असलेला लसूण आता ठोक बाजारात २०० ते २५० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
काही दिवसांपूर्वी अद्रक, लसूण आणि कांद्याचे दरही वाढल्याने भाज्यांची चव बिघडली होती. सरकारने कांद्यावर पुन्हा निर्यातबंदी लागू केल्याने कांद्याची भाववाढ थांबली आहे. शेतकऱ्यांकडून मात्र, त्याला विरोध होत आहे. त्यातच नवीन मालही बाजारात येत आहे. परिणामी ठोक बाजारात किमतीत घसरण सुरू झाली आहे. उत्पादन चांगले असल्याने दर कमी राहतील असा अंदाज व्यक्त होत आहे.
भारतात पिकतो ३२ लाख टन लसूण
भारतात सुमारे ३२.७ लाख टन लसणाचे उत्पादन होते. सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेशात होते. चीनमध्ये उत्पादनात घट होऊनही तो जगात पहिल्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये दरवर्षी सुमारे २ ते २५ दशलक्ष टन लसणाचे उत्पादन केले जाते. दोन्ही देशांमध्ये बहुतेक लसणाचा वापर देशांतर्गत केला जातो.