मुंबई : गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. लालबागचा राजा तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झाला होता. आरती संपन्न झाल्यावर लालबागचा राजा तराफ्यावर बसवण्यात आला. अनेक तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं.
सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. यावेळी चौपाटीचा परिसर गणेश भक्तांनी फुलून गेलेला होता. कोळी बांधवांनी ब्रास बँड आणि बोटींच्या माध्यमातून भर समुद्रात लालबागच्या राजाला सलामी दिली. ज्यानंतर राजा तराफ्यावर बसून विसर्जनास सज्ज झाला. यावेळी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर निनादून निघाला.
मुंबईमधील लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भक्तांनी गर्दी केली होती. ही शान कोणाची लालबागच्या राजाची या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. दरम्यान, घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आता पुन्हा एकदा त्यांच्या दिनचर्येमध्ये व्यग्र होणार आहे.