कल्याण : देशात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. त्याविरोधात देशभरात आंदोलनं सुद्धा सुरु आहेत. मात्र, अजूनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी होत नाही आहे. अशातच आता कल्याणमध्ये एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेसंदर्भात खळबळजनक बाब म्हणजे तिघंही नराधम पीडितेचे नातेवाईक असून यामध्ये 50 वर्षाचा सासरा, 22 वर्षीय दीर आणि 16 वर्षीय अल्पवयीन मामेभावाचा समावेश असल्याचे उघडकीस आलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कल्याण तालुक्यातील एका गावात वीट भट्टीवर तिच्या पतीसह मजुरी करून तिथेच एका झोपडीत राहत होती. 6 सप्टेंबरला रात्री दहा वाजेच्या सुमारास तिन्ही आरोपी पीडित विवाहितेच्या घरात घुसले. त्यानंतर तिच्यावर एका नंतर एक असे मिळून बळजबरी करत तिच्यावर बलात्कार केला.
या घडलेल्या अत्याचारानंतर पीडित महिलेने तिच्या पतीला या घडलेल्या घटनेसंदर्भात सांगितले. मात्र, पतीने देखील तिच्यावर संशय घेऊन तिला दगड-विटाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारादरम्यान पोलिसांना ही माहिती मिळाली. सध्या पीडितेवर एका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.
पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीसह सासरा आणि दिराच्या विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी नराधम सासरा आणि दिराला अटक केली आहे. अल्पवयीन नातेवाईकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.