मुंबई : लाडक्या गणपती बाप्पाचं उद्या 7 सप्टेंबरला आगमन होणार आहे. घरोघरी बाप्पांच्या स्वागतासाठी भक्ताची तसेच सार्वजनिक मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख म्हणजे नवसाला पावणारा गणपती अशी आहे. मुंबई आणि मुंबईच्या बाहेरुन लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात.
यंदाचा लालबागचा राजा हा मयूरासनावर विराजमान झालेला आहे. या वर्षीच्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोक रांगा लावतात. आता या वर्षाच्या राजाची पहिली झलक भक्तांना पाहायला मिळाली. अशातच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे.
लालबागच्या राजा मंडळाचे यंदा 91 वे वर्ष आहे. अंबानी कुटुंब देखील दरवर्षी मुंबईतील लालबाग राजाच्या दर्शनासाठी आवर्जुन उपस्थिती लावते. अशातच यंदाच्या वर्षी अंबानी कुटुंबातील एका सदस्याची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील एका मानाच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.