शहापूर (ठाणे) : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ बुधवारी (ता. १५) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाच वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणाऱ्या बसच्या चालकाचे किनव्हली पुलाजवळ बसवरील नियंत्रण सुटल्याने या बसने उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्यानंतर ही बस या कंटेनरला घासत पुढे गेली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या दोन टेम्पो व दुसऱ्या एका कंटेनरने या बसला मागून धडक दिली.
या पाच वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. अपघातातील जखमींना शहापुरातील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
या अपघातात वृंदा पाटील (वय ३०), पियूष पाटील (वय ३०), रोहिणी हायलिंगे (वय २७) यांचा मृत्यू झाला. कृतिका पाटील (वय ३), आदान खान (वय २८), समीना सय्यद (वय ३५), माया काळे (वय ५५), साई हायलिंगे (वय ३), मच्छिंद्र हायलिंगे (वय ५२), अरुण हायलिंगे (वय ४०), परी हायलिंगे, रहमान इमानदार (वय ३२), शिपा सय्यद (वय ३४), सय्यद साकीर (वय ३८), अनिल गुप्ता (वय ३२), देवदास बाफना (वय ५२), किशोर पाटील (वय ५०) व मुकेश बाफना (वय ४५) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यांपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक छाया कांबळे, शिवकुमार जाधव, शहापुरचे जीवरक्षक टीम व आपत्ती व्यवस्थापन पथकामे घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.