मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँगेसचे काही आमदार शरद पवार यांच्याकडे परत जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा राज्यभर सुरू आहे. आता त्या चर्चांना आणखी बळ मिळणारी घटना घडली आहे. अजित पवार यांच्या पक्षातील चार ते पाच आमदारांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांचा समावेश असल्याने अजित पवार गटामध्ये चिंतेचं वातावरण पसरले आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार यांच्या पक्षाच्या संपर्कात अजित पवारांचे आमदार असल्याची जोरदार चर्चा होती. तसा दावा देखील जयंत पाटील आणि आमदार रोहित पवारांकडून करण्यात येत होता.
दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विधीमंडळाच्या कामकाजासाठी आले होते. त्यावेळी एका कार्यालयात अजित पवार गटाच्या चार ते पाच आमदारांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीवेळी जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आणि अनिल देशमुख हेदेखील उपस्थित होते.