नालासोपारा: पेल्हार पोलीस ठाणे हद्दीतील तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक वर्षापासून वेगवेगळे आरोपी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. याप्रकरणी एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार आहे. वडील व्यसनाधीन असल्याने ३ अल्पवयीन मुलींबाबत ही शोकांतिका घडली.
वडील मुलींच्या आईला मारहाण करत होते, त्यामुळे पत्नी सोडून गेली. मुलींनाही त्यांचे वडील मारहाण करत होते. त्यामुळे गेल्या वर्षी १७ वर्षाची मुलगी घरातून निघून गेली. याच काळात दत्ता क्षीरसागर (३५) या आरोपीने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला आसरा दिला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिला भेटण्यासाठी तिच्या दोन लहान बहिणी तिच्याकडे येत होत्या. या काळात आरोपी क्षीरसागर याने एका बहिणीवर अत्याचार केला. त्याचे दोन साथीदार निशाद खान (१९) आणि सय्यद अशा दोन व अन्य आरोपींनीदेखील मुलींवर अत्याचार केले. मागील वर्षापासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे एक मुलगी गर्भवती राहिली होती.
अखेर या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर पेल्हार पोलिसांनी तिन्ही मुलींची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. यातील दत्ता क्षीरसागर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांत सुमारे ४०० गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता, त्यांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.