मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरूवात होत आहे. अशातच काँग्रेसला महाराष्ट्र राज्यात मोठा धक्का बसला आहे. ५६ वर्ष कॉंग्रेससोबत असलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी ट्विट करत आपल्या राजीनाम्याबद्दल माहिती दिली आहे.
काय म्हणाले देवरा?
मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. यासोबतच माझे माझ्या कुटुंबाचे गेल्या 55 वर्षांपासून काँग्रेससोबत नाते होते. या नात्याला देखील पूर्णविराम मिळाला आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी मला सतत पाठिंबा दिला’ असं ट्विट देवरा यांनी केलं आहे.
दरम्यान मिलिंद देवरा हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत दहा माजी नगरसेवक, वीस महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह ४५० कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया..
आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
तसेच देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.