मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी (ता. २३ फेब्रुवारी) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. दोन दिवसांपूर्वी जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयात जोशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील नेता, अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली होती. शिवसेनेकडून जोशी यांनी मुंबईचे महापौरपदही भूषविले होते. १९९५ मध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदे मनोहर जोशी भूषवली होती.
मागील काही काळापासून प्रकृतीच्या कारणास्तव मनोहर जोशी सक्रीय राजकारणापासून दूर होते. जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील ‘डब्ल्यू ५४’ या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष जोशी सरांवर दादरच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. मागील वर्षी मनोहर जोशी यांनी मोठ्या आजारावर जिद्दीने मात केली होती.
मनोहर जोशी यांची राजकीय कारकिर्द
१९७६ ते १९७७ या काळात मनोहर जोशी मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर ते लोकसभेत गेले.
… ‘या’ कारणासाठी दिला होता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा!
युती सरकारच्या काळात १९९८ मध्ये मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी पुण्यातील कर्वे रस्त्यासारख्या प्राईम लोकेशनवर त्यांचे जावई गिरीश व्यास यांना इमारत बांधायची होती. पण भूखंड शाळेसाठी आरक्षित होता. जेव्हा या इमारतीसंबंधीची फाईल जोशींसमोर आली, तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
या प्रकारामुळे ‘वर्षा’ आणि ‘मातोश्री’ बंगल्यांमधील तणाव अगदी टोकाला गेला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक चिठ्ठी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धाडली. मनोहर जोशी यांनी आधी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा सुपूर्त करावा आणि मगच मला भेटायला यावे, असा निरोप बाळासाहेबांनी पाठवला. हा निरोप मिळताच क्षणाचाही विलंब न करता जोशींनी राज्यपाल अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा दिला होता.