मुंबई : भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार संगमलाल गुप्पा यांच्या पुतण्याने मुंबईत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 15 ऑक्टोबर) दुपारी घडली आहे. अंधेरी पूर्वेकडील हरिदर्शन इमारतीच्या टेरेसवरून त्याने उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सागर रामकुमार गुप्ता (वय- 23 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर मंगळवारी दुपारी कॉलेजमधून घरी परतला. त्याने घरी आल्यावर कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी न बोलता डायरेक्ट सहाव्या मजल्यावर जाऊन ‘डक्ट एरिया’त गेला. तिथून त्याने खाली उडी मारली. त्यावेळी सोसायटीच्या आवारात काहीतरी पडल्याचा आवाज आल्यावर आजुबाजूचे लोक त्याचा मृतदेह पाहून आरडाओरड केली. तसेच त्यांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि ते सागरला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला उपचारांसाठी दाखल करून घेण्याआधी तपासलं आणि त्याला मृत घोषित केलं.
दरम्यान, अंधेरी पोलीस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सागर रामकुमार गुप्ता हा उत्तर प्रदेशचे माजी खासदार संगमलाल गुप्ता यांचा पुतण्या आहे. सागर हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून तो अंधेरी (पूर्व) येथील अंबुजवाडी भागात असलेल्या हरीदर्शन भवनच्या सातव्या मजल्यावर राहत होता. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. सागर गुप्ताने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.