मुंबई : जेईई आणि आयआयटी परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या कडूस (ता.खेड, पुणे) येथील दक्षणा फाउंडेशनमधील १७० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक घटना शनिवारी (ता.२१) सकाळी उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच, आता मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधील ५० मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे विद्यापीठ प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर
वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परीक्षा तोंडावर असताना जुलाब, पोटदुखीने हैराण झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील न्यू गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनींविषयीच्या वृत्ताचे शनिवारी तीव्र पडसाद उमटले. या विद्यार्थिनींना उपचार तर सोडाच, विद्यापीठ प्रशासनाकडून विचारपूसही करण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे.
वसतिगृहातील पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा रिपोर्ट सोमवारी दिला जाणार आहे. तसेच पाच पैकी फक्त तीनच कुलर वापरात आहे. उर्वरीत दोन कुलर अजुन कार्यान्वित नाही, तर ते दोनही कुलर तातडीने वापरासाठी घेण्याच्या सूचना अभियंता विभागास देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या मुलींना अन्नातून विषबाधा मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या दूषित पाण्यामुळे झाली आहे की वसतिगृहात लावण्यात आलेल्या वॉटर कुलरमुळे, याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने केली आहे.