उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. या पाठोपाठ आता महेश गायकवाड यांच्याविरोधात कल्याणमधील बांधकाम व्यावसायिकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.
नेमक प्रकरण काय?
शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोप आहे. हा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने केला आहे. याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शुक्रवारी हिललाईन पोलिसांनी महेश गायकवाड तसेच त्यांचे समर्थक आणि व्दारलीतील इतर ७० ग्रामस्थांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश गायकवाड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा पोलिसांनी गुप्त ठेवला होता. मात्र, गोळीबाराच्या घटनेनंतर रविवारी या दाखल गुन्ह्याचे प्रकरण बाहेर आले आहे. कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र रामअवतार पारीख याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, अक्षय दिनेश गायकवाड, राहुल पाटील, किरण फुलोरे, एकनाथ जाधव, सुनील जाधव आणि इतर ७० लोकांचा यामध्ये समावेश आहे. आरोपींमध्ये तीन महिलांचाही समावेश करण्यात आला आहे.