मुंबई : श्रावण सुरु होणार असल्याने सर्वचजण गटारी साजरी करण्यासाठी नॉन व्हेज पार्ट्यांचे आयोजन करत आहेत. मात्र हा उत्साह सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गटारी दारू पार्टी पाच मित्रांच्या जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दरम्यान तीन जणांनी बाहेर उड्या मारल्याने ते बचावले, मात्र दोन जण गाडीत अडकले होते. यापैकी एकाचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. मात्र एकजण अद्याप ही बेपत्ता आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण क्षेत्रात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार तसेच रविवार सुट्टी असल्याने गटारी साजरी करण्यासाठी पाच मित्र पार्टीसाठी तानसा नदीवर आले होते. ते सर्वजण कल्याणहून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात कारने आले. तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली कारमध्ये बसून ते पार्टी करत होते. त्याचवेळी तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला. त्यात ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले.
त्यातील तिघांनी कार बाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, दोन मित्र गाडीतच अडकले. या पैकी गणपत चिमाजी शेलकंदे यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. मात्र, एकजण अद्याप बेपत्ता आहे. त्यांचा देखील शोध सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि कल्याण क्षेत्रातील 5 मित्र शहापूर तालुक्यातील तानसा नदी क्षेत्रात गटारीची पार्टी करण्यासाठी गेले होते. हे मित्र धरणाच्या 1 नंबर गेटच्या जवळ गाडीमधून बसून पार्टी करत होते. मात्र यावेळी अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला. पाण्याच्या प्रवाहात पाचही जण गाडीसह नदीच्या दिशेने वाहू लागले. यावेळी त्यातील तिघांना गाडीच्या बाहेर उडी मारली, तर दोन जण गाडीमध्येच अडकले. बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा तरूण बेपत्ता आहे. दुसऱ्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे.