मुंबई : ठाणे जिल्ह्यात एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. हि घटना ६ जुलै रोजी कल्याण तालुक्यातील शिळगावात घडली आहे. शिळगाव परिसरातील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी डायघर पोलिसांनी मंदिराचे पुजारी राजकुमार रामफेर पांडे (वय-५४), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (वय-४५), श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (वय-६२) यांना अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करण्याची मागणी विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
नेमकं काय घडलं?
नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाणे हद्दीतील राहणारी विवाहित महिला कौटुंबिक छळाला कंटाळून ६ जुलै रोजी सकाळी शिळफाटा घोळ गणपती मंदिरामध्ये आली होती. त्यावेळी तिला दुपारी जेवण देऊन विश्वास संपादन केला. सायंकाळी महिलेच्या चहामध्ये भांग मिसळून तिला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर रात्रभर तिच्यावर राक्षसी प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांनी जबरदस्तीने आळीपाळीनं बलात्कार केला. त्यानंतर मंदिराच्या मागील बाजूस नेऊन तीची निर्घृण हत्या केली.
हा सर्व प्रकार ६ जुलै रोजी घडला होता. त्यानंतर ९ जुलै रोजी या पीडितेचा अर्धनग्न मृतदेह मंदिरात आलेल्या एका भक्ताला आढळून आला होता. या प्रकरणी डायघर पोलिसांनी मंदिराचे पुजारी पांडे, मिश्रा, शर्मा या तीन आरोपींना चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार करून तीचा खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली.
डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी काय?
याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. या घटनेतील तीनही आरोपींना कडक शिक्षा व्हावी याकरिता विशेष सरकारी अभियोक्त्त्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.