मुंबई : मुंबईत चुनाभट्टीच्या आझाद गल्लीत आज दुपारी गोळीबार झाला. या गोळीबारात एकजण ठार झाला आहे. तर तीनजण जखमी झाले आहेत. या तिघांनाही सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या गोळीबार करणारे सर्व आरोपी फरार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा गँगवार सक्रिय झालाय का? अशी भिंती निर्माण झाली आहे.
ज्या गल्लीत गोळीबार झाला ती अत्यंत चिंचोळी आहे. या गल्लीत 15 ते 17 पेक्षा जास्त राऊंड फायरिंग झाल्याची माहिती आहे. चुनाभट्टी येथील व्हीएन पुरव मार्गावरील आझाद गल्लीमध्ये साडे तीनच्या सुमारास गोळीबार झाला. जखमींपैकी एकाचं नाव पप्पू येरुणकर असं नाव आहे. इतर दोघांची नावे समजली नाही. पोलीस त्यांची माहिती घेत आहेत. जुन्या वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे.
गोळीबार कुणी केला याची माहिती मिळाली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. हल्लेखोरांचा निशाणा कुणावर होता याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. जखमींना भेटून पोलीस त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.दरम्यान, अचानक गोळीबार झाल्याने स्थानिक लोकही घाबरले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसर सील केला आहे. कुणालाही आझाद गल्लीत जाऊ दिलं जात नाही. या भागात स्मशान शांतता पसरली आहे. गोळीबाराचा आवाज आल्याने लोक घाबरून गेले आणि आपल्या घरात लपले. काहींची पळापळ सुरू झाली. गोळीबारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.