भाईंदर : आझाद नगर परिसरात भंगाराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. दीपक चौरसिया उर्फ पप्पू पानवाला असे मृत इसमाचे नाव आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. आगीच्या ज्वाळा इतक्या दाहक आहेत की अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवारी) पहाटे पाचच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भाईंदरच्या आझाद नगर परिसरातील भंगाराच्या गोदामाला आग लागली. बघताबघता आगीने रौद्ररुप धारण केले. या भीषण आगीमध्ये भंगाराच्या गोदामासह आसपासच्या भागातील पन्नासहून अधिक झोपड्या जळू खाक झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या आगीत एक इसम जखमी झाला होता. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यात दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. आग विझववताना अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले. कुलिंग करण्याचे काम सध्या सुरू अग्निशमन दलाकडून सुरू आहे. धुराचे लोळ परिसरात मोठ्या प्रमाणात पसरले आहेत.