(Mumbai Fire): मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले पूर्व येथे एका इमारतीला भीषण आग लागली आहे. नेहरू रोडवरील न्यू पूनम बाग इमारतीला मोठी आग लागली. या आगीत एका 96 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. या आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले.
न्यू पूनम बाग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. तब्बल एक ते दीड तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तिथे सध्या फायर कूलिंगचे काम सुरू आहे.
96 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
या आगीत भाजून एका 96 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. हर्षदा बेन पाठक असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना हर्षदा पाठक या घरात पडल्याचे दिसल्यानंतर त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून सुरू आहे.