मुंबई: येथील नरीमन पॉइंट जवळील भाजप कार्यालयाला आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या असून त्याठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज रविवारी सुट्टी असल्यामुळे कार्यालयात काम सुरू असताना शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे.
या कार्यालयातून राज्यभरातील भाजप संघटनेचे काम पाहिले जाते. येथील आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. यावेळी आजूबाजूच्या परिसरात धूर पसरलेले पाहायला मिळाले.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, ही आग मुख्य कार्यालयात लागली नसून कार्यालयाच्या मागच्या बाजूस लागली होती. त्यामुळे कार्यालयाचे फार नुकसान झालेले नाही. भाजप कार्यालयाला आग लागली तेव्हा जवळपास १०० माणसे आत कार्यालयामध्ये होते. मात्र त्यांना तात्काळ कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. अग्निशामक दलाने वेळीच आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केल्यामुळे आग लवकर नियंत्रणात आली. कदाचित आगीमुळे मोठे नुकसान होऊ शकले असते. पण ते टळले गेले. यामुळे कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचलेली नाही. इतर नुकसानाचा नंतर आढावा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.