मुंबई : स्वभाव पटत नसल्याने बोलणे बंद करणाऱ्या तुर्की देशातील तरुणीचे इंडोनेशियातील मित्राने मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या मुंबईत राहणाऱ्या या तरुणीने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून ना. म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मूळची तुर्की देशातील असलेली २८ वर्षीय तरुणी एका दूतावास कार्यालयात ऑपरेशन मॅनेजर या पदावर नोकरी करत असून, लोअर परळमध्ये वास्तव्यास आहे. समाज माध्यमावरील भाषा शिकण्याच्या ॲपच्या माध्यमातून तिची इंडोनेशियामधील रहिवासी मोहम्मद इसान मुस्ताफा नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. फोन कॉल आणि चॅटिंग करत दोघेही एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण झाले. दोघांनीही एकमेकांना व्हॉटसॲपवर काही फोटोसुद्धा पाठविले होते. काही दिवसांनी एकमेकांचे विचार जुळेनासे झाले. मुस्ताफा याची वर्तवणूक बदलल्याने तक्रारदार तरुणीने त्याच्याशी बोलणे कमी केले.
मुस्ताफा हा सतत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तक्रारदार तरुणी त्याच्याशी फारशी बोलत नसल्याने मुस्ताफाने तिला तुझी वाट लावून टाकण्याची धमकी दिली होती. तरीसुद्धा तक्रारदार तरुणी बोलत नसल्याने मुस्ताफाने तिला अश्लील संदेश पाठविण्यास सुरुवात केली. मुस्ताफाने फेसबुक, इंन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या नावाने खाती उघडून तसेच, गुगल मॅप आणि गुगलवर तक्रारदार तरुणीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले. तक्रारदार तरुणीने त्याला असे न करण्याची विनंती केली. पण, त्याने हा प्रकार बंद केला नाही. अखेर, तरुणीने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.