मुंबई : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातून धडा घेत पवई पोलिसांनी एका बार अॅण्ड रेस्टॉरंटवर छापेमारी करत अल्पवयीन मुलाला दारू प्यायला देणाऱ्या हॉटेल मॅनेजर आणि वेटर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. टेकबहादूर अयेर (४७) आणि विकास राणा (३०) अशी आरोपींची नावे आहेत.
पवईतील साकीविहार रोडवरील लोट्स बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन मुलांना नशेसाठी दारू विक्री करत असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पवई पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री या बार ॲण्ड रेस्टॉरंटवर छापेमारी केली. यावेळी एक १६ वर्षीय मुलगा दारू पिताना पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याच्या टेबलवरील दारूची बाटली आणि ग्लास जप्त केले. हॉटेलचा मॅनेजर अयेर आणि वेटर राणा यांनी अल्पवयीन मुलाला दारू पिण्यासाठी दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर, पोलिसांनी याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दाखल करत दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.