मुंबई : अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज (रविवार) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. परंतु, किती मंत्र्यांचा शपथविधी होणार? कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे मिळणार? हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
प्रशासनाकडून नागपूरच्या राजभवनामध्ये शपथविधीची तयारी सुरु करण्यात आली आहे. आज रविवारी दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडणार आहे. असे राजभवनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. २० ते २५ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपमधील काही ज्येष्ठ मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी माहिती मिळत आहे. भाजपच्या यादीबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून नावे अंतिम करणार असल्याचे समोर आले आहे.
शिवसेनेत पेच..
मंत्रिमंडळात आपला समावेश करण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या इच्छुक नेत्यांनी गर्दी केली होती. प्रत्येकाला पहिल्या टप्प्यात मंत्रीपद मिळावं अशी इच्छा असल्याने शिंदे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. यातूनच शिंदे यांनी फिरती म्हणजेच अडीच–अडीच वर्षे मंत्रीपदे वाटून देण्याचा पर्याय सुचवलं आहे.