मुंबई : नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. महायुतीकडून आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नागपुरातील राजभवनातील लॉनमध्ये आज हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तब्बल 21 दिवस उलटून गेल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आह. तर दुसरीकडे भाजपचे आमदारही रात्रभर प्रतीक्षेत असलेले दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्री पद शपथेबाबतचा निरोप देणारा फोन न आल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली होती. आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदारांना निरोप देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मंत्रिमंडळ विस्तार करातना महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून प्रादेशिक समतोल साधण्यावर अधिक जोर दिसत आहे. प्रादेशिक आणि जातीय समीकरणांसोबत पक्षवाढीसाठी फायदेशीर ठरण्याऱ्या नेत्यांना प्राध्यान्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आपल्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी शनिवारीच देण्यात आली होती. या यादीवर पक्ष श्रेष्ठींकडून दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होणे अपेक्षित होते. मात्र, रात्र उलटून गेल्यानंतरही फोन न आल्याने इच्छुक आमदारांची धाकधूक वाढली होती. अखेर आज सकाळपासून भाजप आमदारांचे फोन खणखणू लागले आहेत.
प्रशासनाकडून नागपूरच्या राजभवनामध्ये शपथविधीची तयारी सुरु करण्यात आली आहे. आज रविवारी दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडणार आहे. असे राजभवनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. २० ते २५ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणाची लागली मंत्रीपदी वर्णी?
भाजपकडून काही ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून आराम देण्यात येणार असल्याचे समजते. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. भाजपकडून नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर, जयकुमार रावल यांनी मंत्रीपदासाठीचे निरोप देण्यात आले आहेत. त्याशिवाय, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. त्यांना देखील फोन करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांनाही संधी मिळणार आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर, राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही फोन गेला आहे. गणेश नाईक, मेघना बोर्डिकर यांनाही मंंत्रिपदाची संधी मिळणार आहे. पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या चार टर्मच्या आमदार माधुरी मिसाळ यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागणार आहे.