मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकिट कापून राजेंद्र गावित यांना पालघर विधानसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे श्रीनिवास वनगा नाराज झाले आणि सोमवारी रात्रीपासूनच घर सोडून निघून गेले होते. तब्बल ३६ तासांनंतर श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (दि. ३०) पहाटे श्रीनिवास वनगा हे घरी आले आहेत. कुटुंबीयांना भेटले आणि ते पुन्हा बाहेर निघून गेले, तसेच वनगा यांनी अज्ञातवासामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अखेर तब्बल ३६ तासानंतर पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा याचा कुटुंबीयांशी संपर्क झाला. आज पहाटे श्रीनिवास वनगा तीनच्या सुमारास घरी येऊन कुटुंबीयांना भेटून पुन्हा दोन दिवस बाहेर गेले आहेत. आपल्याला आरामाची गरज असल्याचं कारण सांगत श्रीनिवास पुन्हा बाहेर गावी जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कुटुंबीयांची चिंता मिटलेली आहे.
दरम्यान, पालघर विधानसभेसाठी तिकीट नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा हे व्यथित होऊन कुटुंबीयांना न सांगता घराबाहेर निघून गेले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय चिंतेत होते. मात्र, श्रीनिवास यांनी घरी येऊन कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे. पालघर विधानसभाचे तिकीट देऊ असं आश्वासन देऊनही एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला नाही, तर उद्धव ठाकरे हे आपल्यासाठी देव असून मी त्या देव माणसाला फसवले, असं वक्तव्य श्रीनिवास वनगा यांनी केले होते.
सुमन वनगा काय म्हणाल्या?
श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना श्रीनिवास वनगा कुठे आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे, याबद्दल विचारपूस करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. परवा रात्रीपासून पोलिसांनी खूप शोधाशोध केली. सर्वजण खूप काळजी करत होते. मुख्यमंत्र्यांनीही फोन केला होता.
यानंतर ते (श्रीनिवास वनगा) रात्री घरी परतले आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आराम करत आहेत. त्यांना आराम करायचा होता, त्यामुळे ते सध्या विश्रांती घेत आहेत. त्यांनी कुठे आहेत, याची काहीही माहिती दिली नाही. पण त्यांच्यासोबत काही जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी घरी कधी येणार याबद्दल काहीही सांगितलेलं नाही, असं सुमन वनगा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.